अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन; वडिलांनी दिली माहिती
क्रीडा

अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन; वडिलांनी दिली माहिती

संगमनेर : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचे निधन झाले आहे. अजिंक्यचे वडील मधूकर रहाणे यांनी ही माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे नाशिक पुणे महामार्गालगतचे गाव आहे. अजिंक्य रहाणेचे हे मूळ गाव. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर त्याच्या आजीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला होता. अजिंक्य आपल्या आजीचा अत्यंत लाडका होता. गावातील त्याच्या बंगल्यालाही आजेची नाव आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये संगमनेरला कधी जाणार, असा प्रश्न अजिंक्यला विचारण्यात आला होता. त्यावेळी अजिंक्य म्हणाला माझी आजी संगमनेरला असते. तिला भेटायची माझी इच्छा आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारली, की लगेचच मी माझ्या आजीची भेट घेण्यासाठी संगमनेर येथे जाईन. मात्र, ही इच्छा अपूर्णच राहिली आहे. संगमनेर येथे राहणाऱ्या अजिंक्यच्या आजीने वयाची शंभरी गाठली होती.

तब्बल तीन दशकांचा दुष्काळ संपवत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध गाबा खेळपट्टीवर विजय नोंदवला. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर खेळवण्यात आला. या मैदानावर मागील 32 वर्षांपासून भारताला विजय मिळवता आला नव्हता. मात्र, अंजिक्य रहाणेच्या संघाने हा इतिहास घडवला. शिवाय, ही मालिकाही 2-1 अशी नावावर केली.