पाकिस्तानच्या धमकीला भारताचे खणखणीत उत्तर, अनुराग ठाकूर यांनी केली एका वाक्यात बोलती बंद
क्रीडा

पाकिस्तानच्या धमकीला भारताचे खणखणीत उत्तर, अनुराग ठाकूर यांनी केली एका वाक्यात बोलती बंद

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने काही दिवसांपूर्वी भारताला धमकी दिली होती. पाकिस्तानशिवाय वर्ल्डकप होऊ शकत नाही, असे म्हणत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ यांनी भारताला ठणकावले होते. पण आता भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी फक्त एका वाक्यात पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची बोलती बंद केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाकिस्तानच्या रमीझ राजा यांनी नेमकं काय म्हटलं होतं, जाणून घ्या…

काही महिन्यांमध्ये आशिया चषक स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेला भारत जाणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे रमीझ राजा यांनी दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला आहे. राजा यांनी सांगितले की, ” पाकिस्तामध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत जर भारत येणार नसले, तर आम्ही देखील त्यांच्या देशात २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळायला जाणार नाही. जर पाकिस्तान भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळणार नसेल, तर या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळणार नाही. कारण पाकिस्तान या वर्ल्डकपमध्ये खेळला नाही तर चाहते या स्पर्धेकडे पाठ फिरवतील. त्यामुळे भारताने याबाबत विचार करायला हवा. कारण ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि ती कायम राहील. कारण पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करत आहे. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची ही एक चांगली संधी असेल. आम्ही भारताला पराभूत केले आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाची लोकप्रियता वाढली आहे.”

अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानला कोणत्या शब्दांत ठणकावले, पाहा….

भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ” क्रीडा विश्वात भारत ही एक मोठी शक्ती आहे आणि कोणताही देश आता भारताकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहा.”

जय शहा यांनी यापूर्वी काय म्हटले होते पाहा…
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकात भारतीय संघ जाणार नाही. जर हा आशिया चषक पाकिस्तानसोडून जर अन्य कोणत्याही देशात होणार असेल तर भारत नक्कीच या स्पर्धेत सहभागी होईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यापूर्वीच सांगितले होते. या सर्व प्रकरणाबाबत बीसीसीआय आणि भारत सरकार यांची भूमिका ठाम आहे. कारण यावर्षी जी आशिया चषक स्पर्धा झाली ती पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार होती. पण भारताने या स्पर्धेला विरोध केला होता. त्यानंतर ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती.