चहरची कमाल; चेन्नईचा पंजाबवर सहज विजय
क्रीडा

चहरची कमाल; चेन्नईचा पंजाबवर सहज विजय

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सत्रात पंजाबच्या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची भेदक गोलंदाजी आणि इतर खेळाडूंनी केलेल्या दमदार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबला 20 षटकात 8 बाद 106 धावांपर्यंतच मजल मारता आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रत्युत्तरात चेन्नईने हे आव्हान 15.4 षटकांतच गाठले आणि यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. महेंद्रसिंह धोनीचा हा चेन्नईसाठी 200वा सामना होता, त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी अजूनच खास ठरला. सामन्यात 4 षटकात 4 बळी घेणाऱ्या दीपक चहरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पंजाबच्या छोटेखानी आव्हानाचा पाठवाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ऋतुराज गाकवाडला (5) बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि मोईन अली यांनी संयमी खेळ करत दोघांनी 37 चेंडूत आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फिरकीपटू मुरुगन अश्विनने अलीला बाद करत अर्धशतकापासून वंचित ठेवले. अलीने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. विजयासाठी 8 धावा असताना मोहम्मद शमीने सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला बाद करत चेन्नईला लागोपाठ दोन धक्के दिले. त्यानंतर सॅम करन आणि डुप्लेसिसने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डु प्लेसिस 36 धावांवर नाबाद राहिला.