ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने मागितली भारतीय संघाची माफी; काय आहे प्रकरण?
क्रीडा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने मागितली भारतीय संघाची माफी; काय आहे प्रकरण?

सिडनी : तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रलियन क्रिकेट मंडळाने भारतीय संघाची माफी मागितली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक वाईट कृत्य भारतीय संघाबरोबर घडले होते, त्याची दिलगिरी आता ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट मंडळाने व्यक्त केली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताचे जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना काही प्रेक्षकांनी शिविगाळ केली होती. या दोघांच्या विरुद्ध वर्णभेदी वक्तव्य करण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर भारतीय संग व्यवस्थापनाने या दोन खेळाडूंसह सामनाअधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. रविवारी सामना सुरू झाल्यानंतर स्टेडियममध्ये पोलिस आले आणि त्यांनी सहा प्रेक्षकांना मैदानाबाहेर घालवले. रविवारी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या डावातील ८६व्या ओव्हरनंतर जेव्हा मोहम्मद सिराज त्याची २५वी ओव्हर टाकून सीमेरेषेवर फिल्डिंग करत होता. तेव्हा तो कर्णधार अजिंक्य रहाणेच्या जवळ आला. ते दोघे मैदानातील अंपायरकडे गेले आणि प्रेक्षकांकडून पुन्हा चुकीची वक्तव्य केली जात असल्याची तक्रार केली.

या सर्व प्रकरणाबाबत ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट मंडळाने भारतीय संघाची माफी मागितली आहे. ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट मंडळाने याबाबत एक पत्रक काढले आहे. या पत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतीय संघातील खेळाडूंबाबत जी वागणूक पाहायला मिळाली, ती खपवून घेणार नाही. दोषींवर कडक कारवाई आम्ही करणार आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचबरोबर मैदानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. दोषींवर आजीवन बंदी घालण्याचा विचारही आम्ही करत आहोत.