राजस्थानचा ३३ धावांनी पराभव; सॅमसनची झुंज अपयशी
क्रीडा

राजस्थानचा ३३ धावांनी पराभव; सॅमसनची झुंज अपयशी

दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने उत्कृष्ट गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला ३३ धावांनी पराभव केला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला. दिल्लीच्या श्रेयस अय्यरने केलेल्या ४३ धावांच्या जोरावर त्यांना राजस्थानसमोर १५५ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्टार फलंदाज दबावात फलंदाजी करण्यात अपयशी ठरले. कर्णधार संजू सॅमसनने ७० धावा करत झुंज दिली खरी, पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणीही साथ दिली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीने या विजयासह गुणतालिकेत १६ गुण नोंदवल पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. राजस्थानच्या संघाला सुरुवातीला तीन धक्के बसले आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज रबाडाने लोमरोरला तर अक्षर पटेलने परागला तंबूत धाडले. अवघ्या ५५ धावांत राजस्थानने आपले ५ गडी गमावले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने आपली झुंज सुरू ठेवली. १५व्या षटकापर्यंत संजूने राजस्थानचा धावफलक ५ बाद ८२ असा केला. १७व्या षटकात सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र मोठे फटके न खेळता आल्याने राजस्थानचा विजय फार लांबला. संजू ८ चौकार आणि एका षटकारासह ७० धावांवर नाबाद राहिला. २० षटकात राजस्थानला ६ बाद १२१ धावा करता आल्या.

दिल्लीची सुरुवातही काहीशी खराब झाली. फॉर्मात असलेला शिखर धवन स्वस्तात बाद झाला. लगेचच पृथ्वी शॉही तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत जोडीनं संघाचा डाव सावरला. ऋषभ त्रिफळाचीत झाल्यावर राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर संजू सॅमसननं श्रेयशला यष्टीचीत केले. त्यानंतर हेटमायरच्या रुपाने पाचवा धक्का बसला. हेटमायरनंतर अक्षर पटेलही तंबूत परतला. त्यानंतर मात्र, ललित यादव १४ आणि आर. अश्विन ६ या धावसंख्येवर नाबाद राहिले. राजस्थानकडून साकारिया, मुस्ताफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.