INDvsENG : पहिल्या डावात इंग्लंडची भरभक्कम आघाडी
क्रीडा

INDvsENG : पहिल्या डावात इंग्लंडची भरभक्कम आघाडी

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यांचा आज या तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडचा पहिला डाव १३२.२ षटकात ४३२ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडे आता ३५४ धावांची मजबूत आघाडी असून भारताला दुसऱ्या डावात चांगला खेळ करणे अपेक्षित आहे. पहिल्या डावात केवळ ७८ धावांवरच त्यांचा डाव संपुष्टात आला होता. यानंतर इंग्लंडने शतकवीर जो रूट आणि बर्न्स-हमीद यांच्या अर्धशतकी योगदानामुळे भारतासमोर चारशेपार धावा उभारल्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज सुरुवातीच्या सत्राच्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकातच भारताने इंग्लंडच्या क्रेग ओव्हर्टन आणि ओली रॉबिन्सन यांना बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. शमीने ओव्हर्टनला आणि बुमराहने रॉबिन्सनला बाद केले. तत्पूर्वी, रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी शतकी भागीदारी रचत इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. बर्न्सला डावाच्या ५०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शमीने बोल्ड केले.

त्यानंतर हसीब हमीदची साथ देण्यासाठी डेव्हिड मलान फलंदाजीला आला. तो मैदानावर रुळेपर्यंत फिरकीपटू रवींद्र जडेजाने हमीदला बोल्ड केले. मात्र, लंचनंतर कर्णधार जो रूट आणि मलान यांनी भारतीय गोलंदाजांना हैराण केले. या दोघांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडची आघाडी दोनशेपार पोहोचवली. मोहम्मद सिराजने मलानचा अडथळा दूर केला. त्याने मलानला पंतकरवी झेलबाद केले. मलानने ११ चौकारांसह ७० धावांची खेळी केली.

चहापानानंतर जो रूटने सलग तिसऱ्या कसोटीत शतक पूर्ण केले. १०४व्या षटकात त्याने इशांतला चौकार खेचत बॅट हवेत उंचावली. शतकी खेळी केल्यानंतर जसप्रीत बुमराहने रूटची दांडी गुल केली. शमीने सर्वाधिक चार तर बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.