दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर
क्रीडा

दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताची पकड; विजयापासून ७ पावले दूर

चेन्नई : दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने पकड मिळवली असून भारतीय संघ आता विजयापासून केवळ ७ पावले म्हणजेच ७ विकेट दूर आहे. ४८२ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर भारताचे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा धैर्याने सामना केला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला चांगला आकार दिला. आता इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज आहे तर भारताला ७ गड्यांची आवश्यकता आहे.

इंग्लंड संघाचा सलामीवीर डॉम सिबली ३ धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाठोपाठ रॉरी बर्न्सदेखील २५ धावांवर अश्विनचा बळी ठरला. तर नाईट वॉचमन जॅक लीचने शून्यावर अक्षरला आपली विकेट बहाल केली. सध्या डॅन लॉरेन्स १९ धावांवर तर जो रूट २ धावांवर खेळत आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवशी सलामीवीर शुबमन गिल (१४) बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले.

चेतेश्वर पुजारा (८) कमनशिबी ठरला आणि धावबाद झाला. पण, त्यानंतर रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) यांची इंग्लंडच्या फिरकीपटूंनी शिकार केली. कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी रविचंद्रन अश्विन यांनी खेळपट्टीवर तग धरला आणि भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी केली. कर्णधार विराट कोहली १४९ चेंडूत ७ चौकारांसह ६२ धावांवर पायचीत झाला. त्यानंतर अश्विनने तळाच्या फलंदाजांना घेऊन सत्र संपेपर्यंत खेळपट्टी सांभाळली. त्याने १०६ धावांची खेळी केली.

सामना संक्षिप्त स्वरूपात…
भारत पहिला डाव- सर्वबाद ३२९ (रोहित शर्मा-१६१; मोईन अली १२८/४)
इंग्लंड पहिला डाव- सर्वबाद १३४ (बेन फोक्स- ४२*; अश्विन ४३/५)
भारत दुसरा डाव- सर्वबाद २८६ (अश्विन १०६; मोईन अली ९८/४)
इंग्लंड दुसरा डाव- ३ बाद ५३ (रॉरी बर्न्स २५; अक्षर पटेल १५/२)