मुंबई : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आज चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. सुपर सन डेला टीम इंडियाच्या विजयासाठी अनेक ठिकाणी चाहते प्रार्थना करत आहेत. दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे. २००० साली टीम इंडियाला न्यूझीलंडने पराभूत केलं होतं. त्याचाही वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. अशातच सामन्याला काही मिनिटे बाकी असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना टीम जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
भारत नक्की ही मॅच जिंकेल, ज्या प्रकारे टीमने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे भारताला १०० टक्के जिंकण्याची संधी असून आमच्याही शुभेच्छा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडने २०१९ च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये पराभूत करत १३० कोटी भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. त्या पराभवाचाही टीम इंडिया वचपा काढण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल.
टीम इंडियासाठी आजच्या फायनल सामन्यासाठी जमेची बाजू म्हणजे चॅम्पियन ट्रॉफीचे सगळेच सामने या मैदानावर खेळले आहेत. तर न्यूझीलंडने लाहोरमध्ये खेळलेत. त्यामुळे न्यूझीलंडला याचा फटका बसणार यात काही शंका नाही. साखळी सामन्यांवेळी टीम इंडिया आणि न्यूझीलंड एकाच ग्रुपमध्ये होते. स्पर्धेत दोन्ही टीम एकदा समोरा-समोर आल्या असून त्यामध्ये टीम इंडियाने किवींना पराभवाची धूळ चारली होती.