वाढदिवस विषेश : सचिन, धोनीपासून विराटपर्यंत कोणालाही मोडता आला नाही आगकरचा विक्रम
क्रीडा

वाढदिवस विषेश : सचिन, धोनीपासून विराटपर्यंत कोणालाही मोडता आला नाही आगकरचा विक्रम

मुंबई : भारतीय माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरचा आज वाढदिवस आहे. त्याच्या नावावर एक असा विक्रम आहे जो आजपर्यंत सचिन तेडुलकर, महेंद्र सिंह धोनीपासून विराट कोहलीपर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. एकदिवसीय सामन्यात आगरकरने २१ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. भारताकडून हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. हा विश्वविक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आगरकरनं शतकी खेळी केली आहे. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आगरकरने १६ चौकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी केली. लॉर्ड्सवर शतक झळकवावं असं अनेकांचं स्वप्न असतं मात्र मोठमोठ्या फलंदाजांचं हे स्वप्न साकार झालेलं नाही. यामध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, एबी डीव्हिलियर्स, जॅक कॅलिस, युनिस खान आणि विराटसह अनेक दिग्गज खेळाडूंना लॉर्ड्सवर शतक करता आलेले नाही. लॉर्ड्सवर मंकड, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अजित आगरकर आणि अजिंक्य रहाणे या भारतीय फलंदाजांनाच शतक झळकावता आलं आहे.

सध्या संघाच्या निवडसमितीच्या अध्यक्षपदासाठी अजित आगरकरचे नाव चर्चेत असून त्याचा आज वाढदिवस आहे. ४ डिसेंबर १९७७ रोजी आगरकरचा जन्म मुंबईत झाला होता. एकवेळ दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून आगकरकडे पाहिलं जात होतं. पण, भारतीय संघानं फलंदाजीपेक्षा गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला. आगरकरनं आपल्या फलंदाजीची चुणूक अनेकवेळा दाखवून दिली होती. दरम्यान, अजित आगरकर याने १९९८ ते २००७ या कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्याने २६ कसोटी सामन्यांमध्ये ५७१ धावा केल्या. १९१ एकदिवसीय सामन्यात २८८ विकेट घेतल्या तर १२६९ धावा चोपल्या आहेत. तर ४ टी-२० सामन्यात १५ धावा केल्या आहेत.