आयसीसीच्या पुरस्कारात धोनी-विराटचा गाजावाजा; मिळाले महत्वाचे पुरस्कार
क्रीडा

आयसीसीच्या पुरस्कारात धोनी-विराटचा गाजावाजा; मिळाले महत्वाचे पुरस्कार

नवी दिल्ली : दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्काराची घोषणा आयसीसीने केली आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहलीने छाप सोडली आहे. विराट कोहली आणि धोनी यांनी आयसीसी पुरस्कारावर ठसा उमटवला आहे. दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू असे मानाचे पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत. तर धोनीला दशकातील खेळभावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०११मध्ये नॉटिंघम येथे झालेल्या कसोटी मालिकेत धोनीनं सर्वांचं मनं जिंकलं होतं. या सामन्यात पंचानी इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला चुकीच्या पद्धतीनं धावबाद दिलं होतं. त्यानंतर धोनीनं मोठं मन करत बेलला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. धोनीच्या या खेळभावनेमुळे त्याला दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार मिळाला आहे. विराट कोहलीनं २०१० ते २०२० या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडूलकरचा १२ हजार धावांचा विक्रम मोडीत काढला. गेल्या दशकात ३९ शतकं, ४८ अर्धशतकं आणि ११२ झेल घेणारा कोहली एकमेव फलंदाज आहे. कोहलीनं दशकात १० हजारपेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. त्यामुळेच विराट कोहलीची दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. तसेच दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा सर गॅरी सोबर्स पुरस्कारासाठीही विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं आहे. स्मिथनं दशकात कसोटी क्रिकेटमध्ये २६ शतकासह सात हजार ४० धावा काढल्या आहेत. अफगाणिस्तानच्या राशिद खानची दशकातील सर्वोत्तम टी-२० खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये राशिदच्या नावावर सर्वाधिक विकेट आहेत. दशकातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय, टी-२० क्रिकेटपटू आणि रेचेल हेयोइ फ्लिंट पुरस्कारावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीनं नाव कोरलं आहे.