तर आजच्या सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित केले जाईल
क्रीडा

तर आजच्या सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित केले जाईल

मॅचेंस्टर : भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली. त्यामुळे आजपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापुढे अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. असं असतानाच दुसरीकडे गुरुवारी रात्री भारतीय संघातील खेळाडूंनी घेतलेल्या बैठकीमध्ये कसोटी खेळण्यासंदर्भात खेळाडूंना रस नसल्याचं आणि करोना संसर्गाची भीती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी मैदानामध्ये उतरण्यास नकार दिला तर इंग्लंडला हा सामना बहाल केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, इंग्लंडकडून या सामन्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. म्हणूनच आता तीन वाजता भारतीय खेळाडू आणि बीसीसीआय काय निर्णय घेणार यावर मँचेस्टर कसोटीचं भवितव्य अवलंबून आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुरुवारी भारतीय संघातील खेळाडूंची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना न खेळण्याच्या बाजूने मत नोंदवलं. द इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रिमियर लिगचं उर्वरित पर्व खेळवलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंनी संसर्गाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसा उत्साही नसल्याचं म्हटलं आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसोबत काम करत होते. सोमवारी संपलेल्या कसोटीसामन्यापर्यंत परमार या खेळाडूंसोबतच होते. नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सर्व भारतीय खेळाडू कोरोना निगेटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या कसोटीबद्दल साशंक आहे.

एकीकडे भारताला खेळण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) मागणी गुरुवारी सायंकाळी केल्याचं सांगण्यात येत आहे.