भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात
क्रीडा

भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय; मालिका खिशात

सिडनी : पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने दुसरा टी- २० सामना ६ गडी राखून जिंकला आहे. कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. १९५ धावांचे आव्हान भारताने २ चेंडू राखूनच पूर्ण केले. कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन यांच्या दमदार कामगिरीनंतर हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणाऱ्या मॅथ्यू वेडने धडाकेबाज सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. मॅथ्यू वेड आणि डार्सी शॉर्ट या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. अखेरीस नटराजनने डार्सी शॉर्टला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार वेडने स्मिथच्या साथीने छोटेखानी भागीरीच्या जोरावर संघाचा डाव सावरला. यादरम्यान वेडने आपलं अर्धशतकही साजरं केलं. परंतू वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मैदानात उडालेल्या गोंधळता वेड धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या.

यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजीला सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. परंतू शार्दुलने मॅक्सवेलला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली, त्याने २२ धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या टी-२० सामन्यात गलथान क्षेत्ररक्षण केलं. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धेतला. फटकेबाजी करणारा स्टिव्ह स्मिथही चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. भारताकडून नटराजनने दोन तर शार्दुल ठाकूर आणि चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.