इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; असा असेल संघ
क्रीडा

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; असा असेल संघ

नवी दिल्ली : पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. तर, अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे इशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. इशांत शर्मानं फेब्रुवारी २०२० मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये दुखापत झाल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आलं होतं. त्याशिवाय कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करण्यास सज्ज आहे. २०१८ नंतर हार्दिक पांड्याचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी केली होती. यांचं संघातील स्थान कायम आहे. सिराजनं तीन कसोटी सामन्यात १३ विकेट घेतल्या होत्या. तर शार्दुल ठाकूरनं एकमेव कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करत ७ बळी घेतले आहेत.

असा असेल भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, ऋषभ पंत , वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर