भारताचा पहिला डाव संपुष्टात; पंतचे नाबाद अर्धशतक
क्रीडा

भारताचा पहिला डाव संपुष्टात; पंतचे नाबाद अर्धशतक

चेन्नई : चेन्नईत भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी भारताने ३०० धावा केल्या होत्या. त्यानंतर आज सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. परंतु, भारत काही समाधानकारक धावसंख्या उभारू शकला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजीचे शेपूट गुंडाळण्यात लवकर यश आले. कालच्या धावसंख्येत भारत केवळ २९ धावांची भर टाकून भारताचे उर्वरित चार फलंदाज तंबूत परतले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काल नाबाद राहणाऱ्या ऋषभ पंत यानं आपल्या अर्धशतकी खेळीत तीन षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. दुसऱ्या दिवशी अक्षर पटेल लगेच तंबूत परतल्यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. दुसऱ्या दिवशी २९ धावांत भारतानं चार गडी गमावले. एका बाजूला ऋषभ पंत विस्फोटक फलंदाजी करत होता. मात्र, त्याला एकाही फलंदाजांनी साथ दिली नाही. पहिल्या दिवशी ३३ धावांवर नाबाद असणाऱ्या ऋषभ पंतनं दुसऱ्या दिवशी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीनं सर्वाधिक चार बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज ओली स्टोन यानं तीन बळी घेतले. याशिवाय जॅक लीच याला दोन तर कर्णधार जो रुटला एक विकेट मिळाली.

अजिंक्य रहाणे आणि पंत यांचा अपवाद वगळता एकाही फंलदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजाराला (२१) चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विराट कोहली, शुबमन गिल, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव यांना खातेही उघडता आलं नाही. अश्विनने १३ धावांची खेळी केली. तर पदार्पणवीर अक्षर पटेल अवघ्या ५ धावांवर बाद झाला. दरम्यान, इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली असून पहिला झटका बसला आहे. डावाच्या पहिल्याच षटकात इशांत शर्माने ही विकेट घेतली.