Euro Cup 2020: स्पेन अन् इटलीची उपांत्य फेरीत धडक
क्रीडा

Euro Cup 2020: स्पेन अन् इटलीची उपांत्य फेरीत धडक

नवी दिल्ली : यूरो कप २०२० स्पर्धेत स्पेन आणि इटलीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी चेक रिपब्लिक विरुद्ध डेन्मार्क आणि युक्रेन विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगणार आहे. या दोन सामन्यातील विजेते उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे कोणता संघ उपांत्य फेरीत धडक मारतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये चेक रिपब्लिक आणि डेन्मार्क तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मागच्या दोन्ही सामन्यात चेक रिपब्लिकने डेन्मार्कवर विजय मिळवला आहे. यूरो कप २००० स्पर्धेतील साखळी सामन्यात, तर २००४ यूरो कप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत नमवत उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे आता या सामन्यात कोण विजय मिळवणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. चेक रिपब्लिक संघाने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात स्कॉटलँडचा २-० ने पराभव केला. त्यानंतर क्रोएशियाविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर इंग्लंडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला. तर बाद फेरीत नेदरलँडचा २-० ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

डेन्मार्कची या स्पर्धेतील सुरुवात खराब झाली, पहिल्या सामन्यात फिनलँडकडून १-० ने पराभव सहन करावा लागला. त्यानंतर बेल्जियमकडून २-१ ने हार पत्कारावी लागली. तर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात रशियाचा ४-१ ने पराभव करत बाद फेरीत धडक मारली. बाद फेरीत डेन्मार्कने वेल्सचा ४-० ने धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व फेरीत युक्रेन विरुद्ध इंग्लंड सामना रंगणार आहे. मागच्या सात सामन्यात इंग्लंड युक्रेनवर वरचढ असल्याचं दिसून आलं आहे. ७ पैकी ६ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.

युक्रेनला साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात नेदरलँडकडून पराभव सहन करावा लागला. त्यानंतर नॉर्थ मसेडोनिया संघाचा २-१ ने पराभव केला. तर ऑस्ट्रिया विरुद्धचा तिसरा सामना ०-१ ने गमवला. त्यानंतर बाद फेरीत स्वीडनचा २-१ पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. इंग्लंडने साखळी फेरीत क्रोएशिया आणि चेक रिपब्लिक संघाला पराभवाची धुळ चारली आहे. तर स्कॉटलँड विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. बाद फेरीत जर्मनीचा २-० ने पराभव करत इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.