मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहच्या नावावर दोन आगळावेगळे विक्रम
क्रीडा

मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहच्या नावावर दोन आगळावेगळे विक्रम

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध आज सुरू झालेल्या सामन्याआधीच बुमराहने एक आगळावेगळा पराक्रम करत एका विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८मध्ये जसप्रीत बुमराहने कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर प्रत्येक दौऱ्यावर बुमराहने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. पण घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्याआधी विदेशात सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने थेट विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बुमराहने इंग्लंडविरूद्ध आज भारतात आपली पहिली कसोटी खेळली. याआधी त्याने विदेशात तब्बल १७ कसोटी सामने खेळले. घरच्या मैदानाआधी विदेशात सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूचा विक्रम वेस्ट इंडिजच्या डॅरेन गंगाच्या (१७) नावावर होता. त्या विक्रमाशी आज बुमराहने बरोबरी केली. भारतीय खेळाडूंचा विचार केल्यास वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने विदेशात १२ कसोटी खेळल्यावर भारतात कसोटी पदार्पण केले होते.

दरम्यान, जसप्रीत बुमराहने आणखी एक विक्रम केला. घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्याआधी सर्वाधिक गडी मिळवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सामना सुरू होण्याआधी बुमराहच्या नावावर ७९ कसोटी बळी होते. हा विश्वविक्रम आधी वेस्ट इंडिजच्या अल्फ व्हॅलेंटाइन यांच्या नावावर होता. त्यांनी मायदेशात पहिली कसोटी खेळण्याआधी विदेशात ६५ कसोटी बळी टिपले होते.