IND vs ENG : बुमराहला मिळणार विश्रांती; या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
क्रीडा

IND vs ENG : बुमराहला मिळणार विश्रांती; या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

अहमदाबाद : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. बुमराहने गेल्या काही काळात सातत्याने भारताच्या तिन्ही संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्याच्यावरील भार हलका करण्यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते.

शिवाय ऋषभ पंतचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात असून सूर्यकुमारलाही यंदा प्रथमच संजू सॅमसनच्या जागी संघात स्थान मिळू शकते, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येणार असून प्रत्येक सामना हा भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

वेळापत्रक
१२ मार्च : पहिला टी-२० सामना
१४ मार्च : दुसरा टी-२० सामना
१६ मार्च : तिसरा टी-२० सामना
१८ मार्च : चौथा टी-२० सामना
२० मार्च : पाचवा टी-२० सामना