ना विराट ना रोहित, केवळ हा खेळाडू मोडेल सचिनचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम
क्रीडा

ना विराट ना रोहित, केवळ हा खेळाडू मोडेल सचिनचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. पण त्याचा हा विक्रम ना विराट कोहली तर ना रोहित शर्मा मोडू शकणार आहे. सचिनने कसोटीत जेवढ्या धावा केल्या त्या उंचीपर्यंत पोहोचणं हे प्रत्येक फलंदाजासाठी एक स्वप्नच आहे. पण इंग्लंडचे महान क्रिकेटपटू जेफरी बॉयकॉट यांच्या मते भारताबाहेरील एक फलंदाज हा विक्रम मोडण्यास सक्षम आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जो रूटमध्ये जगात सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. रूट दोनशेहून अधिक कसोटी खेळू शकतो आणि सचिनपेक्षा जास्त कसोटी धावा करू शकतो असा मला विश्वास आहे. रूट आता केवळ ३० वर्षांचा आहे. त्याने ९९ कसोटी सामने खेळले असून ८ हजार २४९ धावा केल्या आहेत. जो रूटला जर दुर्दैवाने फारच गंभीर प्रकारची दुखापत झाली तर तो क्रिकेटपासून दूर जाऊ शकतो. पण सुदैवाने तसं काहीही घडलं नाही तर तो सचिनचा १५ हजार ९२१ कसोटी धावांचा विक्रम नक्कीच मोडेल, असं मत बॉयकॉट यांनी आपल्या द टेलिग्राफमधील स्तंभात व्यक्त केलं.

सध्याच्या घडीचे महान फलंदाज विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यासोबत रूटचं नाव घेतलं जातं. हे सारे अतिशय प्रतिभावान खेळाडू आहेत. या साऱ्यांमध्येही सर्वाधिक धावा करण्याची क्षमता आहे. पण सध्या तरी आपण या साऱ्या खेळाडूंसोबतच रूटची तुलना करायला हवी आणि त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटायला हवा. रूटच्या खेळाची तुलना निवृत्त झालेल्या खेळाडूंच्या खेळाशी करणं चुकीचं ठरेल. कारण प्रत्येकाच्या वेळी खेळाची परिस्थिती वेगळी होती, असंही बॉयकॉट यांनी नमूद केले.

तत्पूर्वी, कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक २०० सामने खेळले. त्यात सचिनने ३२९ डावांत ५४च्या सरासरीने एकूण १५ हजार ९२१ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीत सचिनने ५१ शतकं आणि ६८ अर्धशतके ठोकली. नाबाद २४८ ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ठरली.