क्रीडा

मुंबईला पराभूत करुन धोनीचा नवा विक्रम; आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव कर्णधार

मुंबई : सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. महेंद्रसिंग धोनीने मुंबईला सलामीच्या सामन्यात पराभूत करून इतिहास रचला. चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना हा धोनीचा १००वा विजय ठरला. अशी कामगिरी करणारा धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव कर्णधार ठरला आहे. धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एकूण १०५ विजय मिळवले आहेत, पण त्यातील ५ विजय त्याने पुणे वॉरियर्स संघासाठी मिळवले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली. सौरभ तिवारीच्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.

दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो १७ धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणारा सौरभ तिवारीदेखील ३१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. हार्दिक पांड्या (१४), कृणाल पांड्या (३) आणि कायरन पोलार्ड (१८) यांनी निराशा केली. त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. दोन गडी स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. रायडूने ७१ धावा ठोकल्या. तो बाद झाल्यावर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत