आफ्रिदीचा विक्रम मोडत टीम साऊदी दुसऱ्या स्थानावर
क्रीडा

आफ्रिदीचा विक्रम मोडत टीम साऊदी दुसऱ्या स्थानावर

कराची : न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे टाकत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये साऊदीने 3 बळी घेतले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 98 बळी घेतले आहेत. टिम साऊदीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 99 बळींची नोंद झाली आहे. या विक्रमात श्रीलंकेचा लसिथ मलिंगा अव्वल स्थानी आहे. मलिंगाने 107 बळी घेतले आहेत. साऊदीला मलिंगाचा विक्रमही मोडण्याची संधी आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खानने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 95 विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशच्या शकीब अल हसनने 92 बळी घेतले आहेत.

भारताकडून यजुर्वेंद्र चहलने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. चहलच्या नावावर 62 बळींची नोंद आहे. एकूण टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो अव्वल स्थानी आहे. ब्राव्होने आतापर्यंत टी-20 कारकिर्दीत 515 बळी घेतले आहेत. मलिंगाने टी-20 क्रिकेटमध्ये 390 बळी घेतले आहेत. सुनील नरिननेही 390 बळी घेतले आहेत.