अखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश
क्रीडा

अखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश

नेपियर : न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली असून व्हाईटवॉश नामुष्की टाळली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १७४ धावांचं आव्हान पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. अखेरचा सामना गमावला असला तरीही न्यूझीलंडने मालिकेत २-१ने बाजी मारली आहे. तिन्ही सामन्यांत आक्रमक खेळी करणाऱ्या टीम सेफर्टला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाकिस्तान संघाने यजमान न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात केली आहे. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला धक्का देण्यात पाकिस्तानला यश आलं. हारिस रौफने मार्टीन गप्टीलला तर फईम अश्रफने सेफर्ट आणि विल्यमसनला माघारी धाडलं. यानंतर डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलीप्स यांनी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. कॉनवेने ४५ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार लगावत ६३ धावा केल्या. फिलीप्सने त्याला ३१ धावा काढत चांगली साथ दिली. या जोरावर न्यूझीलंडने ७ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या. पाकिस्तानकडून फईम अश्रफने ३, शाहीन आफ्रिदी-हारिस रौफ यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी झाल्यानंतर हैदर अली बाद झाला. यानंतर मोहम्मद हाफीजने पुन्हा एकदा महत्वपूर्ण खेळी करत रिझवानला चांगली साथ दिली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर कुगलेजनने पाकची जोडी फोडली. यानंतर पाकच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. त्यातच ५९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८९ धावांची खेळी करत रिझवानही माघारी परतला. त्यानंतर इख्तियार अहमदने फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अर्धशतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद रिझवानला सामनावीराचा किताब मिळाला.