चेन्नईच्या संघात करोनाचा शिरकाव!
क्रीडा

चेन्नईच्या संघात करोनाचा शिरकाव!

चेन्नई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसताना आयपीएल स्पर्धेवरही कोरोनाचे सावट गडद झाले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सीएसकेच्या कंटेंट टीमचा एक सदस्य करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंटेंट टीमचा हा सदस्य कोणत्याही खेळाडूशी संपर्कात नव्हता. मात्र, धोका कायम आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या आयपीएलच्या सामन्यांपूर्वी कोरोनाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या सदस्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. खेळांडूच्या संपर्कात न आल्यामुळे चेन्नईने आपले सरावसत्र सुरूच ठेवले आहे. यंदाच्या हंगामात सीएसके आपला पहिला सामना 10 एप्रिलला मुंबईत दिल्ली कॅपिटल्सशी खेळणार आहे.

भारतातील आणि मुख्यत: महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलचे सामने खेळवण्याबाबत हैद्राबाद आणि इंदूरला एक पर्यायी स्थळ म्हणून ठेवले आहे. चेन्नईच्या सूत्रांनी सांगितले की, संघाने यावेळी कोणताही प्रोटोकॉल तोडलेला नाही आणि संघ या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहे. कंटेट टीमचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पण यावेळी आम्ही संघासमवेत कोणत्याही प्रकारचा धोका घेत नाही आणि सर्व खबरदारी घेत आहोत.