पुजारा म्हणतो, ‘या’ दोघांमुळेच मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं
क्रीडा

पुजारा म्हणतो, ‘या’ दोघांमुळेच मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकत भारतीय संघाने कमाल केली. ही मालिका भारतीय संघाने २-१ने जिंकली. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. चौथ्या डावात ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने ९१ तर ऋषभ पंतने नाबाद ८९ धावा केल्या. त्यांच्या इतकाच या विजयात मोलाचा वाटा चेतेश्वर पुजाराने उचलला. पुजाराने २००पेक्षा अधिक चेंडू खेळून काढले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शरीरावर सातत्याने होणारे चेंडूचे आघात झेलत तो मैदानावर भिंत बनून उभा राहिला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. त्याच्या या खेळीमागे नक्की काय गुपित होतं याबद्दल त्याने नुकतंच सांगितलं. शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे आमचे सलामीवीर आहेत. हे दोघेही आक्रमक फलंदाज आहेत. त्यांच्या या खेळींचा मला फायदा झाला. जेव्हा तुमचा मैदानवरील साथीदार गोलंदाजांचा समाचार घेत धावा काढत असतो, तेव्हा तुम्हाला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ मिळतो. धावा काढण्याचा दडपण तुमच्यावर येत नाही. या दोघांसोबत खेळताना मला माझा नैसर्गिक खेळ खेळण्याची पूर्ण संधी मिळाली आणि मी त्या संधीचा वापर करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं, असं एचटीशी बोलताना पुजाराने सांगितलं.

मी विरेंद्र सेहवागसोबतही फलंदाजी केलेली आहे. तो फलंदाजी करताना गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायचा. त्यामुळे फलंदाज आधीच दडपणाखाली असायचे. त्याचा मला प्रचंड फायदा झाला. म्हणूनच सेहवागसोबत मी चांगल्या भागीदारी करू शकलो, असंही पुजाराने स्पष्ट केलं.