डी-कॉकच्या त्या कृतीमुळं १९३वर फखर जमान झाला बाद
क्रीडा

डी-कॉकच्या त्या कृतीमुळं १९३वर फखर जमान झाला बाद

जोहान्सबर्ग : पाकिस्तान विरुद्द दक्षिण आफ्रिका सामन्यामध्ये पाकिस्तानचा सलामीवर फखर जमानने १५५ चेंडूंमध्ये १९३ धावांची दमदार खेळी केली. मात्र, तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेवटच्या षटकामध्ये पाकिस्तानला विजयासाठी ३०हून अधिक धावा हव्या होत्या. या षटकामध्ये फखरने पहिलाच चेंडू सीमारेषेपर्यंत मारला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरी धाव घेताना फखरचं लक्ष क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूकडे नव्हतं. याचा फायदा द. आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने घेतला. क्विंटन डी-कॉकने क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने चेंडू नॉन स्ट्राइकर एण्डला फेकल्याचा इशारा केला. हात वर करुन डी-कॉकने चेंडू तिकडे फेक असं म्हटलं. त्यामुळे फखरने मागे वळून पाहिलं. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्याने चेंडू थेट फखर धावत होता त्या दिशेने फेकत यष्ट्यांचा अचूक वेध घेतला. फखर १९३ धावांवर बाद झाला. संघाला जिंकवता आलं नसतं तरी फखरला उरलेल्या चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण करता आलं असतं, असं पाकिस्तानी चाहत्यांचं म्हणणं आहे. डी-कॉकचं हे वागणं फेक फिल्डींगअंतर्गत येत असून द. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमालासुद्धा शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पाकिस्तानी चाहते करत आहेत.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानवर १७ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. द. आफ्रिकेच्या संघाने निर्धारित ५० षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात ३४१ धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानच्या संघाला केवळ ३२४ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानच्या खेळीमध्ये फखर जमानचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकलं. धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रम फखरने स्वत:च्या नावावर करुन घेतला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियन फलंदाज शेन वॉटसनच्या नावे होते. २०११मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना वॉटसनने १८५ धावा केल्या होत्या.