रोहित शर्माची ‘त्या’ खेळाडूसाठी भावनिक पोस्ट
क्रीडा

रोहित शर्माची ‘त्या’ खेळाडूसाठी भावनिक पोस्ट

मुंबई : भारताची आगामी इंग्लंडविरूद्धच्या मालिकेनंतर आयपीएलच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं BCCIला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाला करारमुक्त केल्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक भावनिक पोस्ट लिहली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला करारमुक्त करण्यात आले. त्यानंतर रोहितने मोजक्या शब्दात पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. क्रिकेट या खेळाला समृद्ध करणारा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे लसिथ मलिंगा. तू खऱ्या अर्थाने मॅचविनर आहेस. संघातील आणि ड्रेसिंग रूममधील तुझा सहवास आणि वावर आम्ही नक्कीच मिस करू. तुझी उणीव भासेल, असा संदेश त्याने आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिला आहे.

IPL2021साठी आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाने श्रीलंकेचा तेज गोलंदाज लसिथ मलिंगाला बाय-बाय केला आहे. मलिंगासोबत मिचेल मॅक्लेनेघन यांसारख्या बड्या नावांना सोडचिठ्ठी दिली. तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट या मॅचविनर खेळाडूंना संघात कायम राखले आहे.

IPL 2020मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. कोणत्याही संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पाच वेळा पटकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच सलग दोन वर्षे स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरणारा चेन्नईनंतर मुंबई केवळ दुसरा संघ ठरला. मुंबईच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१९ आणि २०२० अशी दोन्ही विजेतेपदे सलग जिंकली. मुंबईकडून अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. पण काही खेळाडूंना संधी मिळू शकली नाही.