हैद्राबादने गमावला हातातला सामना; बंगळुरुचा ६ धावांनी विजय
क्रीडा

हैद्राबादने गमावला हातातला सामना; बंगळुरुचा ६ धावांनी विजय

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरुने हैद्राबादवर 6 धावांनी विजय मिळवला. हैद्राबादने हातात असलेला हा सामना गमावला. नाणेफेक जिंकत बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे हैद्राबादने बंगळुरूला 20 षटकात 8 बाद 149 धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादला 20 षटकात 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूकडून अर्धशतक ठोकलेल्या मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. बंगळुरूचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय, तर हैदराबादचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हैद्राबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. बंगळुरूच्या मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात साहाला तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नर यांनी डाव सांभाळला. पांडे आणि वॉर्नर यांनी आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. अर्धशतकानंतर जेमिसनला मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉर्नर ५४ धावांवर बाद झाला. शेवटच्या 4 षटकात 35 धावांची गरज असताना हैद्राबादने जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद या तीन फलंदाजांना शाहबाज अहमदच्या एकाच षटकात गमावले. बेअरस्टोने 13 तर, पांडे 38, तर समदला एकही धाव न करता माघारी परतला. त्यानंतर आलेला विजय शंकरही हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन बाद झाला. राशिद खानने सिराजला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत धावांचे अंतर कमी केले, मात्र, याच षटकात जेसन होल्डर झेलबाद झाला. शेवटच्या षटकात हैदराबादला 16 धावांची गरज होती. हर्षल पटेलने टाकलेल्या या षटकात हैदराबादला 9 धावाच घेता आल्या.

तत्पूर्वी, बंगळुरूकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकात भुवनेश्वरने पडीक्कलला तंबूचा मार्ग दाखवला. त्याने 11 धावा केल्या. काही धावांच्या अंतरानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला शाहबाज अहमदही (14) बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूला सावरले. संघाला शतकाजवळ नेताना जेसन होल्डरने विराटला बाद केले. विराटने 33 धावा केल्या. विराटनंतर एबी डिव्हिलियर्स मैदानात आला, मात्र, राशिद खानने त्याला स्थिरावण्याची संधीच दिली नाही. वॉर्नरकडे झेल देऊन तो एका धावेवर बाद झाला. शतकानंतर बंगळुरूने वॉशिंग्टन सुंदर(8) आणि डॅनियल ख्रिश्चन (1) या आपल्या अजून दोन फलंदाजांना गमावले. राशिद खानने सुंदरला झेलबाद केले. मनीष पांडेने सुंदरचा अप्रतिम झेल टिपला. राशिदने आपल्या 4 षटकात फक्त 18 धावा देत 2 बळी घेतले. तर, टी. नटराजनने ख्रिश्चनला यष्टीपाठी झेलबाद केले. दुसऱ्या बाजुला असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मॅक्सवेलने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 59 धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. हैद्राबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर, राशिद खानने 4 षटकात 18 धावात देत 2 फलंदाजांना बाद केले.