५३ वर्षांनंतर जुळून आला योगायोग; रोहित-गिल जोडीचा पराक्रम !
क्रीडा

५३ वर्षांनंतर जुळून आला योगायोग; रोहित-गिल जोडीचा पराक्रम !

सिडनी : रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी भारतीय संघाची चौथ्या डावात सुरुवात केली. पण, पहिल्या डावाप्रमाणेच खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघेही बाद झाले. पहिल्या डावात रोहित लवकर बाद झाला होता, तर दुसऱ्या डावात गिलने लवकर तंबूचा रस्ता धरला. असे असले तरी या जोडीने एक दमदार पराक्रम केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रोहित-गिल जोडीने पहिल्या डावात ७० धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा या जोडीने संघाला शांत आणि संयमी सुरूवात मिळवून दिली. पण दुर्दैवाने ७१ धावांच्या भागीदारीनंतर शुबमन गिल बाद झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. याचसोबत भारतीय सलामीवीरांनी दोन्ही डावात ५०पेक्षा जास्त भागीदारी करण्याची ही ऑस्ट्रेलियातील केवळ दुसरीच वेळ ठरली. तब्बल ५३ वर्षांनी असं घडलं आहे. याआधी १९६८ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना एकाच सामन्यात दोन्ही वेळा भारतीय सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिली होती. त्यानंतर आज रोहित-गिल जोडीने हा पराक्रम करून दाखवला.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामना अतिशय रंगतदार अवस्थेत असून भारतीय संघाने दिवसअखेर २ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली. आजच्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर डाव घोषित केला आणि भारताला मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने खेळ संपेपर्यंत रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा बळी गमावला. सध्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानावर आहेत. सामन्याच्या उवर्रित एका दिवसाच्या खेळात विजयासाठी भारताला ३०९ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ८ बळींचाी आवश्यकता आहे.