महाराष्ट्रातील धावपटूचा स्पर्धा सुरु असतानाच मृत्यू
क्रीडा

महाराष्ट्रातील धावपटूचा स्पर्धा सुरु असतानाच मृत्यू

पंढरपूर : क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील धावपटू बंडू वाघमोडे याचा हरियाणात मृत्यू झाला आहे. स्पर्धा सुरू असताना बंडू वाघमोडे हा मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. धावपटू बंडू वाघमोडे हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील निवासी होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हा हरियाणात गेला होता. बंडू वाघमोडे हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता आणि तो अवघ्या 21 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, बंडू वाघमोडे हा ग्रामीण भागातील असून त्याचे वडील हे मेंढपाळ आहेत. बंडू हा महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता आणि त्यासोबतच इतरही कामे करुन आपल्या कुटुंबाचं उदर्निर्वाह करण्यासाठी वडिलांना हातभार लावत होता. बंडू याला सैन्य दल किंवा पोलीस दलात जाण्याची इच्छा होती. मात्र, काळाने घात केला.

बंडू वाघमोडे हा स्पर्धेत धावत असताना अचानक मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. बंडू वाघमोडे याच्या मृत्युचं नेमकं कारण काय आहे हे समजू शकलेलं नाही. बंडू वाघमोडे याचे पार्थिव लवकरच सोलापूर येथे आणण्यात येणार आहे.