भारताला आणखी एक सुवर्ण; भालाफेकीत सुमित अंतिलला सुवर्ण
क्रीडा

भारताला आणखी एक सुवर्ण; भालाफेकीत सुमित अंतिलला सुवर्ण

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाला आणखी एक सुवर्ण पदक मिळाले आहे. सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे. त्याने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याआधी नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक पटकावले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पॅरालिम्पिकमध्ये भारताची शानदार कामगिरी सुरूच आहे. सुमितच्या आधी भारताला नेमबाजीतही सुवर्णपदक मिळाले आहे. भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण आहे. अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. रस्त्यावर झालेल्या अपघातात एक पाय गमावलेल्या सुमितचे हे पदक इतरांसाठी प्रेरणेचे काम करणार आहे. सुमित हा मूळचा हरयाणाचा आहे. तो सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे एका आजाराने निधन झाले.

सुमितच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले आहे. आमचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये चमकत आहेत! पॅरालिम्पिकमधील सुमित अंतिलच्या विक्रमी कामगिरीचा राष्ट्राला अभिमान आहे. सुमितने प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुला भविष्यासाठी शुभेच्छा, असे ट्वीट मोदींनी केले आहे.