मराठमोळा पॅरा जलतरणपटू सुयशचा मोठा पराक्रम!
क्रीडा

मराठमोळा पॅरा जलतरणपटू सुयशचा मोठा पराक्रम!

मुंबई : महाराष्ट्राचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधवने मोठा पराक्रम केला आहे. टोकियो पॅरालिम्पिक पात्रता फेरीत प्रवेश करत त्याने विक्रम रचला आहे. यासह तो पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत देशातील कोणत्याही जलतरणपटूने ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकसाठी पात्रता मिळविली नव्हती. सुयश आता टोकियो येथील स्पर्धेत ५० मीटरच्या एस-७ वर्गात आणि २०० मीटरच्या वैयक्तिक मेडलीच्या एसएम-७ वर्गात सहभाग घेणार आहे. २०१८ साली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतील प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पात्रता फेरीत धडक दिली.

५० मीटर बटरफ्लाय फेरीचा टप्पा पार करण्यासाठी त्याला ०.३२.९० सेकंदाचा कालावधी देण्यात आला होता. यावेळी त्याने अवघ्या ०.३२.७१ सेकंदात ही फेरी पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले होते. तर, २०० मीटर मेडली फेरी पूर्ण करण्यासाठी २.५७.०९ सेकंदाचा अवधी होता आणि त्याने २.५६.५१ सेकंदात ही फेरी पार करत कांस्य पदक जिंकले होते. तो सध्या पुण्यात सराव करत आहे.

विद्युत झटक्याने लहानपणी गमावले दोन्ही हात
लहानपणीच दोन्ही हात गमावलेल्या सुयशने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावर १२५ पदके मिळवली आहेत. घराच्या गच्चीवर पतंग उडवताना सुयशला विद्युत तारेला स्पर्श झाला होता. या घटनेनंतर, काळे पडलेले दोन्ही हात कापावे लागतील, असे मुंबईतील डॉक्टरांनी सांगितले.