IND vs ENG : भारताचा चौथ्या सामन्यात विजय; मालिकेत बरोबरी
क्रीडा

IND vs ENG : भारताचा चौथ्या सामन्यात विजय; मालिकेत बरोबरी

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मालिकेत आता भारताने 2-2 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 185 धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवचे तुफानी अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या झटपट खेळीमुळे टीम इंडियाला दोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. प्रत्युत्तरात इंग्लंडला 8 बाद 177 धावांपर्यंत मजल मारता आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने आपला पहिला गडी जोस बटलरच्या रुपात गमावला. त्याने 9 धावा केल्या. बटलर बाद झाल्यानंतरही सलामीवीर जेसन रॉयने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला डेव्डिह मलान या सामन्यात अपयशी ठरला. राहुल चहरने त्याची 14 धावांवर दांडी गुल केली. मलानपाठोपाठ जेसन रॉयही माघारी परतला. हार्दिक पंड्याने त्याचा काटा काढला. रॉयने 6 चौकार आणि एका षटकाराहसह 40 धावा केल्या. त्यानंतर बेन स्टोक्स आणि आणि जॉनी बेअरस्टो यांनी भारताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या चिंतेत भर टाकली.

विजयासाठी 50 पेक्षा जास्त धावांची गरज असताना राहुल चहरने बेअरस्टोला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. बेअरस्टो 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने स्थिरावलेला फलंदाज बेन स्टोक्स आणि इंग्लंडचा कर्णधार ईऑन मार्गन यांना बाद करत सलग दोन हादरे दिले. स्टोक्सने 23 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर शेवटच्या षटकांत जोफ्रा आर्चरने हाणामारी करत सामन्यात रंगत निर्माण केली. पण, त्याचे प्रयत्न तोकडे पडले. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3, हार्दिक पांड्या आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 2 तर, भुवनेश्वरला एक बळी घेता आला.