रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी
क्रीडा

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी

ओव्हल : सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेल्या भागीदारीच्या जीवावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. रोहितने (२५६ चेंडूंत १२७ धावा) साकारलेल्या शतकाला चेतेश्वर पुजाराच्या (१२७ चेंडूंत ६१ धावा) अर्धशतकाची बहुमूल्य साथ लाभली. त्यामुळे भारताकडे आता चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर १७१ धावांची आघाडी झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिसऱ्या दिवशी अंधूक सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा भारताने ३ बाद २७० धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार विराट कोहली २२, तर अष्टपैलू रवींद्र जडेजा ९ धावांवर खेळत आहे. शुक्रवारच्या बिनबाद ४३ धावांवरून पुढे खेळताना रोहित-राहुलच्या जोडीने ८३ धावांची सलामी दिली. जेम्स अँडरसनने राहुलला ४६ धावांवर बाद केले. त्यानंतर रोहित आणि पुजारा यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १५३ धावांची भागीदारी रचली. रोहितने मोईन अलीला षटकार लगावून दिमाखात शतकाची वेस ओलांडली. एकंदर आठवे शतक झळकावणाऱ्या रोहितने कसोटी कारकीर्दीतील ३,००० धावांचा टप्पाही गाठला. ऑली रॉबिन्सनने रोहित आणि पुजाराला एकाच षटकात बाद केले.

संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : १९१
इंग्लंड (पहिला डाव) : २९०
भारत (दुसरा डाव) : ९२ षटकांत ३ बाद २७०