रोहित शर्मा लवकरच होईल भारतीय संघाचा कर्णधार
क्रीडा

रोहित शर्मा लवकरच होईल भारतीय संघाचा कर्णधार

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माला लवकरच कर्णधारपदाची संधी मिळू शकते असं निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारतीय क्रिकेट संघात लवकरच वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील अशी शक्यताही किरण मोरे यांनी व्यक्त केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोरे म्हणाले, ‘मला वाटतं बोर्डाचं व्हिजन काय आहे यावर या गोष्टी अवलंबून असतात. रोहित शर्माला लवकरच संधी मिळेल असं मला वाटतं. विराट कोहली धोनीच्या नेतृत्वात खेळला असून हुशार कर्णधार आहे. अजून किती काळ टी-२० आणि कसोटी संघाचं नेतृत्व करु इच्छितो याचा विचार तोदेखील करत असेल. इंग्लंड दौऱ्यानंतर अशा अनेक निर्णयांबद्दल शिकण्यास मिळेल’.

इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या अनेक संघांमध्ये कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार असून भारतातही हा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो असा विश्वास किरण मोरे यांनी व्यक्त केला आहे. भारतातही हा फॉरमॅट यशस्वी होईल. वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघाच्या भविष्याबद्दल काय वाटतं हे महत्वाचं आहे. तिन्ही संघाचं नेतृत्व करत चांगली कामगिरीदेखील करणं विराटसाठी सहज बाब नाही. पण प्रत्येक फॉरमॅटमध्ये नेतृत्व करताना चांगली कामगिरी करत विजय मिळवणं याबद्दल मी त्याला श्रेयदेखील देतो, पण मला वाटतं ती वेळ येईल जेव्हा विराट कोहली आता बास झालं, रोहितला नेतृत्व करु दे असं सांगेल, असं किरण मोरे म्हणाले आहेत.