मोठी बातमी ! फेसबुकच्या अडचणीत वाढ! विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप?
टेक इट EASY

मोठी बातमी ! फेसबुकच्या अडचणीत वाढ! विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप?

नवी दिल्ली : फेसबुकच्या अडचणीत वाढ झाली असून अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये फेसबुकविरोधात एकवटल्याचं चित्र आहे. अमेरिकेतील 46 राज्यांनी आणि युएस फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकविरोधात खटला दाखल केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फेसबुकवर एकाधिकार स्थापित करण्याचा आणि छोट्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडण्यासाठी बाजारातील ताकदीचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचा बिजनेस पॅरेंट कंपनीपासून वेगळा ठेवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. फेसबुकविरोधात हा खटला दाखल झाल्याचं वृत्त समोर येताच फेसबुकचे शेअर्सही गडगडले.

फेसबुकविरोधात दाखल केलेल्या खटल्याबाबत फेडरल ट्रेड कमिशन आणि न्यू-यॉर्क अ‍ॅटॉर्नी जनरल लेटिटिया जेम्स यांनी माहिती दिली. जवळपास एका दशकापासून, फेसबुक आपल्या ताकदीचा वापर करुन छोट्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकण्यासाठी करत आहे, असं जेम्स म्हणाले. आपल्या वर्चस्वासाठी धोका ठरण्याआधीच फेसबुक छोट्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचं अधिग्रहण करते असाही आरोप त्यांनी केला. फेसबुकने आपला एकाधिकार टिकवण्यासाठी एक रणनीति तयार केली आहे. 2012 मध्ये फोटो शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामचं अधिग्रहण, 2014 मध्ये मोबाइल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचं अधिग्रहण हा त्यांच्या रणनितीचाच भाग आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना तोटा झाला आणि सोशल नेटवर्किंगसाठी नेटकऱ्यांसमोर मर्यादित पर्याय राहिलेत असा आरोप फेसबुकवर करण्यात आला आहे.

फेसबुकच्या जनरल काउंन्सल जेनिफर न्यूस्टेड यांनी खटल्याचा विरोध करताना हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे आरोपही त्यांनी फेटाळले. अधिग्रहण केल्यापासून इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपला तोटा होण्याऐवजी जास्त फायदा झाला, शिवाय दोन्ही प्लॅटफॉर्म्सच्या युजर्सनाही फायदा झाल्याचं, जेनिफर न्यूस्टेड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या खटल्याचा निकाल जर फेसबुकविरोधात गेला तर फेसबुकला इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स विकावे लागण्याची शक्यता आहे.