अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार
इतर राजकारण

अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमकतेपुढे अ‍ॅमेझॉनने माघार घेतली आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी मागण्यात आल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. मात्र अ‌ॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेवरुन सुरु झालेल्या मोहिमेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना 5 जानेवारीला दिंडोशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी महाराष्ट्रातील पुण्यातील कोंढवा येथील अमेझॉनच्या ऑफिसवर शुक्रवारी सकाळी हल्लाबोल करत कार्यालायची तोडफोड केली. त्यानंतर दुपारी मुंबईच्या चांदिवली परिसरातील अमेझॉनच्या गोदामाची स्थानिक कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.

मात्र, अमेझॉनने माघार घेत आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. याबाबत बोलताना अखिल चित्रे यांनी मनसैनिकांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या आहेत. ”अमेझॉनवर काही वेळातच मराठीची घोषणा ..श्रेय सर्व धडाकेबाज महाराष्ट्र सैनिकांचे.. अभिनंदन. असे ट्वीट करत त्यांनी मनसैनिकांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या आहेत

तसेच, “ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अ‍ॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं त्यांनी टाकलं आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असं सांगितलं होतं. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अ‍ॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं,” असं यांनी सांगितलं. तसेच, “राज ठाकरे, आमचे सचिव, पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी अशी आमची पहिली अट होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ५ तारखेला सर्व केसेस ते रद्द करणार आहेत”. असेही अखिल चित्रे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनसेने मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांन नोटीस बजावत ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला होता.

त्यानुसार, शुक्रवारी मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे प्रचंड आक्रमक झाली असून राज्यभरात अ‍ॅमेझॉनची कार्यालयं फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी मनसैनिकांकडून करण्यात आली. मनसेच्या या आक्रमकतेनंतर अ‍ॅमेझॉनने माघार घेत आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिले आहे.