इतर राजकारण

रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ अटकेनंतर भाजपाची राज्यसरकारवर टीका

मुंबई : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट TRP रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन TRP वाढवण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा मोठी कारवाई करत पोलिसांनी विकास खानचंदानी यांना अटक केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र या अटकेवरून भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. पोलिसांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय खानचंदानी यांना अटक केल्याचं रिपब्लिक टीव्हीकडून सांगितलं जात आहे. याच मुद्द्यावर भाजपा नेत्यांकडून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. “कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली… महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे”, अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत केली आहे.

दरम्यान, टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर विकास खानचंदानी यांची सुरुवातीला चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स पाठवलं होतं. त्यावेळी मात्र खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांनी दाखल आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली होती.

“ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचं दिसत आहे. आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावं. यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी,” असं न्यायालयानं म्हटलं होतं. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे.

माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त केल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली होती. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखील अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रिपब्लिक टीव्हीची देखील याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

टीआरपी रेटींगचं सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीचा डेटा लिक झाल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. तसेच, अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात आहेत. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार असल्याचे मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनी त्यावेळी सांगितलं होतं.