सौरव गांगुलीच्या प्रकृतीत बिघाड; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
इतर

सौरव गांगुलीच्या प्रकृतीत बिघाड; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या तब्येतीत अचानक बिघडल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. मात्र आज दुपारी त्याच्या छातीत थोडं दुखू लागल्याने त्याला कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने कुटुबीयांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सौरव गांगुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार,  काल रात्रीपासून सौरव गांगुलीच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्याने डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. ग्रीन कॉरिडोर बनवून सौरव गांगुलीला त्याच्या बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आले. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर ७ जानेवारीला गांगुलीला डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली होती.

भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत.

२००३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नॅटवेस्ट सीरिजमध्ये भारताने धोबीपछाड दिला होता. त्या विजयानंतर लॉर्ड्सच्या गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट काढून फिरवलेला साऱ्यांच्या आजही लक्षात आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कार्यभार त्याच्याच देखरेखीखाली सुरु आहे. BCCI अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. करोना संकटातही IPL2020चे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा होता.