संजय राऊत नाशिक दौऱ्यावर; भाजपाचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार?
इतर राजकारण

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर; भाजपाचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार?

नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिक मालापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा हा दौरा असून यावेळी नाशिक भाजपमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे भाजपचे हे दोन बडे नेते कोण? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये गेल्याचा वचपा काढण्यासाठीच राऊत यांचा हा दौरा असल्याचंही बोललं जात आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या महिन्यात शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमधील अनेक नेत्यांनी सानप यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देऊ नये अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. पण, सर्वांचा विरोध डावलून सानप यांना पक्षात घेण्यात आले होते. सानप यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते.

संजय राऊत यांच्या यापूर्वीच्या नाशिक दौऱ्यात अनेक भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र यावेळचा राऊत यांचा हा पूर्वनियोजित दौरा नसून केवळ भाजपच्या दोन बड्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठीच राऊत नाशिकला जात आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही बडे नेते माजी खासदार, माजी आमदार आहेत की पालिकेतील नेते आहेत? याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाटेवर असलेले हे दोन नेते कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, सानप हे पंचवटी परिसरात राहतात. या भागाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं असून पंचवटीत त्यांचा दबदबा आहे. या परिसरातून 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला किमान 15 जागांवर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच सानप यांनी पक्ष बदलल्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेनेने नाशिकमध्ये फिल्डिंग लावली आहे.