इतर

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर शेतपिकांचे मोठे नुकसान

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा फैलावू लागला असतान दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागले आहे. मराठवाड्यासह आज राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ढगांच्या गडगडाटासह लातूर जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे या भागातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. तालुक्यातील हसनाबाद ,तळेगाव, सुरंगळी या भागात पहाटे 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे. या भागातील पिकांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जातोय. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामळे जागोजागी गारांचा खच पडल्याचं दिसून आलंय.

वाशिम जिल्ह्यातही विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे या भागातील फळबागासह रब्बी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे अमरावतीतील पथ्रोड येथे गोठ्यात काम करत वीज अंगावर पडून अविनाश गोल्हर या 29 वर्षीय शेतकरी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतात बांधून ठेवलेल्या बैल जोडीवर विज पडून बैलजोडीचा मृत्यू झाला. तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, अंजनगाव सूर्जी सह 9 तालुक्यात मोठ्या प्रमाणावर या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान केलं आहे.

परभणीच्या सोनपेठ तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामुळे हातातोंडाशी आलेल्या गहू, हळद, हरभरा, ज्वारी, भाजीपाला या पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे . हवामान विभागानं राज्यात तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार परभणी जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून गारवा निर्माण झालाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *