वायरल झालं जी

तालिबान्यांना ठार करत घेतला आई-वडिलांच्या हत्येचा बदला; मुलीच्या धाडसाचं होतंय कौतुक

काबुल: अफगाणिस्तानमधील कमर गुल या मुलीच्या आई-वडिलांच्या कट्टरतावाद्यांनी काही दिवसांपुर्वी हत्या केली होती. या घटनेच्या एक आठवड्यानंतर मुलीने दोन कट्टरवाद्यांना संपवत त्याचा बदला घेतला आहे. मुलीच्या या धाडसाचे सध्या सोशल मिडीयावर जोरदार कौतुक होत आहे.

अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात ही घटना घडली आहे. मुलीचे वडील हे अफगाणिस्तान सरकारचे समर्थक असल्यामुळे हे कट्टरवादी त्यांच्या घरी आले होते. त्यांनी मुलीच्या आई वडिलांना घराबाहेर खेचत त्यांचा खून केला होता. त्यानंतर मुलीने बंदुक उचलत दोघांना गोळ्या घालून ठार केलं होतं. तर इतर बरेच जण जखमी झाल्याने पळून गेले. घटनेनंतर मुलीचा एके-47 बंदूक हातात घेतलेला फोटोही गेल्या काही दिवसांत व्हायरल झाला होता.

यानंतर आणखी काही कट्टरवादी तिच्या घरावर पुन्हा हल्ला करण्यासाठी ग्रीवा गावात दाखल झाले. पण गावकरी आणि लष्कराने त्यांचा प्रतिकार करत त्यांना हुसकावून लावलं. मुलीचं वय 14 ते 16 दरम्यान असून तिला आणि तिच्या लहान भावाला आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं प्रशासनाने सांगीतले आहे.

सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे, तालीबानचा मुकाबला करत मुलीने दाखवलेल्या धाडसाचे इंटरनेटवर प्रचंड कौतुक केले जात आहे. तालिबानकडून नेहमीच सरकार आणि अफगाणिस्तानच्या सैन्याला समर्थन देणाऱ्या व्यक्तींची हत्या केली जाते. यावर्षीच काही महिन्यापुर्वी तालिबान आणि सरकार यांच्याच शांततेचा करार झाला आहे, तरीही हिंसाचार थांबलेला नाही.