विमानाची खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय! प्रवाशाची अजब मागणी; एअर होस्टेसनं काय केलं?
वायरल झालं जी

विमानाची खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय! प्रवाशाची अजब मागणी; एअर होस्टेसनं काय केलं?

मुंबई: अलीकडच्या काळात विमानात हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेससोबत गैरवर्तन किंवा विनयभंगाच्या घटना घडल्याचे प्रकार अनेकदा कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाच्या विमानात एका भारतीय प्रवाशाने विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या सगळ्या नकारात्मक बातम्यांच्या गदारोळात सोशल मीडियावर सध्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक प्रवासी एअर होस्टेसला हाक मारून बोलावताना दिसतो. एअर होस्टेस जवळ आल्यानंतर प्रवाशाने तिच्याकडे एक अजब मागणी केली. विमानाची खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचा आहे, असे त्याने सांगितले. त्याच्या या वाक्यावर विमानात एकच हशा पिकला. एअर होस्टेसह विमानातील इतर प्रवाशीही खळखळून हसायला लागले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात एक घृणास्पद प्रकार घडला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने विमानात बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या वृद्ध महिलेवर लघुशंका केली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.विमानातील दिवे बंद असताना मद्यधुंद अवस्थेतील प्रवासी दुपारच्या जेवणानंतर पीडित महिलेच्या सीटजवळ गेला. त्यानंतर त्याने स्वतःच्या पँटची चेन उघडली. त्यानंतर आपले गुप्तांग तिला दाखवत अंगावर लघवी केली होती.. त्यानंतर अन्य सहप्रवाशाने त्याला हाकलेपर्यंत तो तिथेच उभा राहिला होता. २६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमान AI 102 मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर एकच गहजब उडाला होता. सुरुवातीला विमानातील वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पीडित महिला प्रवाशाने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून केबिन क्रू यावेळी अत्यंत असंवेदनशील वागल्याचे सांगून निराशा व्यक्त केली होती.

भाजपच्या खासदाराने अचानक विमानाचं दार उघडलं

अलीकडेच इंडिगो एअरलाईन्समध्ये घडलेला आणखी एका प्रसंगाची चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्यावर्षी १० डिसेंबरला हा प्रकार घडला होता. त्यानंतर महिनाभर या प्रकरणाची कुठेही वाच्यता झाली नव्हती. नंतर त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी विमानाचा आपातकालीन दरवाजा (इमर्जन्सी एक्झिट) उघडल्याचे सांगितले. तेजस्वी सूर्या हे आपातकालीन दरवाजाच्या बाजूला बसले होते. विमान उड्डाण घेणार असतानाच तेजस्वी सूर्या यांनी अचानक इमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा उघडला होता. ही बाब विमानातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच सुरक्षेच्या कारणास्तव सगळ्यांना खाली उतरवण्यात आले. आपातकालीन प्रवेशद्वार उघडल्यामुळे विमानातून हवा बाहेर जात असल्याचे कारण प्रवाशांना सांगण्यात आले. यानंतर हे विमान जवळपास दोन तास उशिराने सुटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *