वायरल झालं जी

मास्क घातला नाही म्हणून बकरीला अटक केली; उत्तर प्रदेश पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल

कानपूर: जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे, देशात देखील करोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज नवे उच्चांक गाठत आहे वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणं सरकारनं बंधनकारक केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अशाच एका उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे चक्क बकरीला अटक केली आहे. यामुळे देशभरात उत्तर प्रदेश पोलिस चर्चेचा विषय बनले आहेत. बेकनगंज येथील पोलिस पेट्रोलिंग करत असताना अचानक रस्त्यात एक बकरी आढळली. मास्क न घालता फिरत असल्यामुळे पोलिसांनी या बकरीला जीपमध्ये बसवून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याची घटना घडली आहे, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत पोलिस बकरीला गाडीत टाकताना दिसत आहेत. त्यानंतर बकरीच्या मालकाने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत बकरीला सोडण्याची विनंती केली त्यानंचर पोलिसांनी मालकाला घराबाहेर मास्क घातल्याशिवाय पडू नको असे बजावून सोडून दिले.

त्यानंतर अनवारगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी शैफुद्दीन बेग यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ‘पोलिसांनी पॅट्रोलिंगच्यावेळी एका तरुणाला मास्क न घालता बकरीला फिरवत असताना पाहिलं. पोलिसांना पाहताच तो तरुण बकरीला सोडून पळून गेला, त्यामुळे पोलिसांनी जीपमधून बकरीला पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि नतर ती बकरी मालकाला परत करण्यात आली. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने उत्तर प्रदेश पोलिसांची सोशल मिडीयावर हसु झाले आहे.