महानायक दिलीप कुमार; पाकिस्तान ते भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा प्रवास
ब्लॉग

महानायक दिलीप कुमार; पाकिस्तान ते भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा प्रवास

५० ते ७० च्या दशकातील चित्रपट आजही पाहिल्यानंतर त्यातील प्रत्येक पात्र आणि संवाद लक्षात ठेवण्यासारखे असतात, त्यांना विसरणे अशक्य आहे. भारतीय सिनेसृष्टीत काही खूपच दुर्मिळ कलाकार झाले आहेत. त्यांची आठवण नेहमीच काढली पाहिजे अशा महान कलाकारांपैकी एक महानायक दिलीप कुमार आहेत. ते आता ९८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून त्यांचा मी मोठा चाहता होतो. नुकतेच त्यांचे काही चित्रपट पाहिले आहेत. त्यावरून त्यांच्याविषयी लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेला, शहीद, अंदाज, आन, देवदास, नया दौर, मधुमती, यहूदी, पैगाम, मुगल-ए-आजम, गंगा-जमना, लीडर तथा राम और श्याम या चित्रपटातील नायक म्हणून अभिनेता दिलीप कुमार स्वतंत्र भारताच्या पहिल्या दोन दशकांत लाखो युवा प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. आतापर्यंत भारतीय उपखंडातील लाखो लोक त्यांच्या चमत्कारीत अभिनयाचा अनुभव चित्रपटातून घेतात.

दिलीप कुमार
सभ्य, सुसंस्कृत, खानदानी अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर रंगीत आणि रंगहीन (ब्लॅक अँड व्हाईट) अनके प्रकारे अभिनय त्यांनी केला आहे. एक अयशस्वी (मधुबाला मुळे) प्रेमी म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली होती , त्यासोबतच त्यांनी त्याकाळात हेही सिद्ध केले की ते कॉमिक (विनोदी) भूमिकांमध्ये सुद्धा कमी नाहीत. एक अष्टपैलू व संवेदनशील अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते.

आज भारतीय चित्रपट इतिहासात एक महान अभिनेता म्हणून दिलीप कुमार यांची ओळख आहे. 1944 मध्ये बॉम्बे टॉकीज निर्मित “ज्वार भाटा” या चित्रपटापासून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली. त्यांचं फिल्मी करियर जवळपास 6 दशके चालले त्यात त्यांनी 60च्या वरती सिनेमात ऍक्शन, हिस्टरी, रोमँटिक, कॉमेडी अश्या बऱ्याच प्रकारच्या सिनेमात काम केलं आहे.

आपल्या करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी 9 फिल्म फेअर अवार्ड आपल्या नावे केली. सगळ्यात जास्त फिल्म फेअर अवार्ड मिळवण्याचा रिकॉर्ड आज पण त्यांचाच नावे आहे. एवढंच नाही तर 1954 मध्ये बेस्ट ऍक्टरसाठी फिल्म फेअर जिंकणारे ते पहिलेच कलाकार होत. भारत सरकारने त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदान पाहता 1991मध्ये पद्म भूषण आणि 2015 मध्ये पद्म विभूषण देऊन गौरव केला. त्यांना 1994 मध्ये सिने जगतातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार दादासाहेब फाळके देऊन गौरवण्यात आले. पाकिस्तान सरकार ने देखील 1997 मध्ये त्यांना पाकिस्तानातील सर्वोच्च पुरस्कार निशान-ए-इम्तिआज देऊन सम्मानित केलं आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर भारतात मोठं वादंग निर्माण झाले होते.

पाकिस्तान ते भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेशाचा प्रवास :
पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खानने कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे (आई) कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी (अघाजी) उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले.

नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्यालीखुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणीसमोर उभे राहिले. देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली. युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते. देविकाराणींच्या सूचनेवरूनच दिलीपकुमार या टोपण नावाने ज्वार भाटा या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. ज्वार भाटा फ्लॉप राहीली त्या नंतर 1947 मध्ये त्यांची जुगनू हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा सुपर हिट ठरला या नंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. 1948 मध्ये आलेली शहीद, अनोखा प्यार, मेला सारख्या चित्रपटानीं त्यांना सुपर स्टार बनवले. 1950 मध्ये आलेल्या जोगन, दीदार आणि त्यागी या चित्रपटांनी त्यांना ट्राजेडी किंग म्हणून ओळख दिली.

मुघल-ए-आझमचे चित्रीकरण चालू असताना दिलीपकुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, या वदंतेला त्यांनी त्यांच्या या आत्मकथनात दुजोरा दिला आहे. सायरा बानूशी झालेला विवाह हे विधिलिखित होते. हे वैवाहिक जीवन प्रदीर्घ काळ टिकले, असा दिलीपकुमार यांचा विश्वास आहे. मध्यंतरीच्या काळात १९८२ मध्ये अस्मा रहेमान या महिलेसोबत केलेला दुसरा विवाह ही आपल्या आयुष्यातील घोडचूक होती. माझ्यावरील विश्वास आणि प्रेमामुळेच सायराने मला माफ केले आणि त्यातून सावरायला मदत केली, असा कबुलीजबाबही दिलीपकुमार यांनी दिला आहे.

१९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला बैराग हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या क्रांति (१९८१) पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या सेकंड इनिंगमध्येही शक्ति, विधाता, मजदूर, दुनिया, मशाल, कर्मा, सौदागर अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. त्यांनी लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होत भाराभर चित्रपट साइन करणे कटाक्षाने टाळले. एका वेळी एक अथवा दोनच चित्रपट हे तत्त्व कसोशीने पाळले. त्यामुळेच दिलीप कुमार यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा सर्वात श्रीमंत आणि समृद्ध वारसा मिळाला आहे.

स्वातंत्र्यानंतर हिंदी चित्रपटात नायकत्वाची व्याख्या परिपूर्णता स्पष्ट झाली ते त्यांच्यामुळेच. स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक ध्येययवादी ज्वलंत प्रश्न समोर असताना चित्रपटाच्या माध्यमातून अनेक स्वप्न दिले. कोणतीही आकांक्षा-अपेक्षा नसताना विश्वास निर्माण केला. त्यासोबतच खरे, खोट,हसणे, रडणे, नाचणे-गाणे, प्रेम, निराशा, नम्रतेसह पराभव स्वीकारणे आणि जिंकण्याची इच्छा निर्माण करणे आदी गोष्टी अभिनय व चित्रपटातून लोकांना शिकविले. म्हणूनच ते भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक झाले असेच म्हणावं लागेल.