विखे-पाटील येतो म्हणाले पण गेलेच नाहीत, उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; धनगर आंदोलक संतप्त
राजकारण

विखे-पाटील येतो म्हणाले पण गेलेच नाहीत, उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; धनगर आंदोलक संतप्त

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले, याच मागणीसाठीचे नगरमधील नाभिक समाजाचेही उपोषण सुटले. त्यानंतर आज चौंडीतील धनगर समाजाचे उपोषणही मिटण्याची चिन्हे होती. यासाठी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मध्यस्थी करण्यासाठी चौंडीला जाणार होते. त्यांचा दौराही ठरला होता. धनगर समाजातील अनेकांचा राग असूनही विखे पाटील आंदोलनस्थळी जाणार म्हणून याला महत्व प्राप्त झाले होते. अशातच विखे पाटील यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी याचा निषेध करीत अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे राज्य सरकाराचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या वेळी राज्यसरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच वटहुकुम निघाला नाही तर पुढे महाराष्ट्र तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. या उपोषणास गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून पाठींबा वाढत आहे. याची सरकाकडून दखल घेतली जात नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या युवक बांधवांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यां चौंडी येथील आंदोलकांना भेटण्यासाठी येणार असल्याचे कालच निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार आज सकाळी त्यांची चौंडीत प्रतीक्षा सुरू होती. मात्र सकाळी ऐनवेळी हा दैरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे संतप्त आंदोलकांनी राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध केला. राज्य सरकारने उपोषणाची दखल न घेतल्यास महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर बांधवांनी दिला आहे.