मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महेश भोसले यांची बेदाणा निर्मिती उद्योगात भरारी
शेती

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महेश भोसले यांची बेदाणा निर्मिती उद्योगात भरारी

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कामती बु. येथील आरकेबी बेदाणा हा ब्रँड झाला आहे. याला भोसले परिवारातील दुसऱ्या पिढीतील ४ भावंडांची जवळपास दीड दशकाची मेहनत आहे. या भक्कम पायावर पुढच्या पिढीतील महेश रामराव भोसले यांनी आज आणखी एक टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून त्यांनी तुषार ॲग्रो बेदाणा निर्मिती उद्योग सुरू केला आहे. यामध्ये गेली दोन वर्षे सोलापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्षांवर प्रक्रिया करून दर्जेदार बेदाणा निर्मिती केली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महेश यांचे शिक्षण बी. एस्सी ॲग्री झाले आहे. त्यांनी नेदरलँडस् मध्ये एम. बी. ए. केले आहे. परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यानंतर वडिलांनी आधीच सुरू केलेला व्यवसाय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे नेण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यांनी कृषिविषयक घेतलेल्या शिक्षणाचा फायदा त्यांना हे युनिट सुरू करताना झाला. काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत त्यांनी बेदाणा निर्मिती प्रक्रिया उद्योग सुरू केला. त्याचं हे तिसरं वर्ष आहे.

तुषार ॲग्रोची बेदाणा निर्मितीची २ युनिटस् आहेत. पैकी वडिलांच्या कार्यकालातील युनिटमध्ये फक्त त्यांच्या स्वतःच्याच दीडशे एकर बागेतील द्राक्षांवर प्रक्रिया करून आरकेबी ब्रँडचा बेदाणा तयार केला जातो. अन्य शेतकऱ्यांच्या बेदाणानिर्मितीसाठी व्यावसायिक दृष्टीने २ वर्षांपूर्वी तुषार ॲग्रो बेदाणा निर्मिती हे युनिट सुरू करण्यात आले. हे युनिट साधारण ४ एकर क्षेत्रावर आहे, त्यातील १५००० चौ. फुटावर प्रशस्त शेड उभारण्यात आले आहे. द्राक्षे ते बेदाणा निर्मिती या प्रक्रियेसाठी साधारण तीन दिवस लागतात. गेल्या दोन वर्षांत त्यांनी २ हजार टन बेदाणा निर्मिती केली आहे. यासाठी ते किलोमागे साडेसहा रूपये सेवा दर आकारतात.

याबाबत महेश भोसले म्हणाले, बेदाणा निर्मितीचा हा प्रकल्प १ कोटी ६७ लाख रूपयांचा आहे. बेदाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जवळपास ७५ लाख रूपयांचा मशिनरी सेट आहे. यामध्ये द्राक्ष वाळवणे, धुणे, नेटिंग आणि पॅकिंग अशी प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पासाठी आम्ही बँकेकडून सव्वा कोटी रूपये कर्ज घेतले आहे. मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून अर्ज केल्यानंतर मला एकूण ३७ लाख रूपये अनुदान मंजूर करण्यात आले. त्यातील पहिला हप्ता रक्कम रूपये १७ लाख प्राप्त झाले आहेत. दुसरा हप्ता महिनाभरात मिळेल.

सोलापूरसह कर्नाटक, उमदी, लातूर अशा जवळपास १०० कि. मी. च्या अंतरावरील शेतकरी त्यांची द्राक्षे मोठ्या विश्वासाने तुषार ॲग्रोकडे पाठवतात. इथे तयार झालेल्या बेदाण्यास अन्य कंपन्यांच्या तुलनेत १० ते २० रूपये अधिकचा भाव मिळतो, असे महेश भोसले अभिमानाने सांगतात. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. प्रशस्त व सुसज्ज शेडमुळे अवकाळी पाऊस जरी आला तरी त्याचा फटका परगावचे शेतकरी तसेच त्यांच्या मालाला बसत नाही. त्यासाठी जवळपास ५० बिहारी आणि स्थानिक मजूर त्यांच्याकडे राबत आहेत. या मजुरांची निवास व भोजनाची सोय त्यांनी केली आहे. माध्यान्ह भोजन योजनेतून भोजन, निवासासाठी १० बाय १० च्या रूम, सुसज्ज सामाईक शौचालय अशा सोयी सुविधा ते पुरवतात. त्यामुळे मजुरांना त्यांच्याकडे काम करताना अडचण जाणवत नाही.