शास्त्रीय संगीताऐवजी रागसंगीत हा शब्द अधिक योग्य – विदुर महाजन
बातमी मराठवाडा

शास्त्रीय संगीताऐवजी रागसंगीत हा शब्द अधिक योग्य – विदुर महाजन

स्वरांमधील नात्यांमधून संगीत तयार होते व भारतीय अभिजात संगीतासाठी ‘शास्त्रीय संगीत’ असा शब्दप्रयोग न करता रागसंगीत असा करायला हवा, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महफिल ए सितार’ या मुलाखत सत्रात सुप्रसिद्ध संगीतकार विदुर महाजन यांनी केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विद्यापीठाच्या वतीने विदुर महाजन यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यमन रागाने आपल्या वादनाला सुरुवात केली. आलाप, जोड झालाच्या माध्यमातून महाजन यांनी श्रोत्यांची मने जिंकली. एकल सतार वादनानंतर ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या संगीत विभागातील प्रा. डॉ. शिवराज शिंदे व प्रा. किरण सावंत यांनी विदुर महाजन यांची मुलाखत घेतली.

विदुर महाजन यांनी सुरू केलेले सतारीतून ध्यानधारणा, व्यसनातून व्यासंगाकडे, कॉर्पोरेट जगतात येणाऱ्या ताण-तणावावर सतारीच्या माध्यमातून तणाव हलका करणे अशा विविध अभिनव उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. सतार या वाद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी खेडोपाडी व अत्यंत दुर्गम ठिकाणी जाऊन सतारीचे मार्गदर्शनाचे ८०० हून अधिक प्रयोग विदुर महाजन यांनी केले आहेत.

भैरवीने या मैफिलीची सांगता झाली. सतारीच्या या मनमोहक सुरांत संपूर्ण विद्यापीठ न्हाऊन निघाले. मैफिलीला विद्यापीठातील आंतरविद्याशाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पानसकर, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने, व्यवस्थापन परिषद सदस्या व वाणिज्य शास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. माधुरी देशपांडे, भाषा संकुलाच्या डॉ. शैलजा वाडीकर, अभ्यासक्रम विभागाच्या डॉ. सरिता यन्नावार, डॉ. रमजान मुलाणी, शहरातील प्रसिद्ध सतार वादक श्री. अतुल देशपांडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.

प्रारंभी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शिवराज शिंदे यांनी केले असून सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनुराधा जोशी-पत्की यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नामदेव बोंपीलवार, प्रा. प्रशांत बोंपीलवार, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. कैलास पुपुलवाड, प्रा. अभिजित वाघमारे, निशिकांत गायकवाड यांनी परिश्रम घेतले.