निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!
राजकारण

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते. शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय टाकून त्यांना शिवसेना हे नाव दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा