फडणवीसांचा विक्रम मोडीत; ही तरुणी 21व्या वर्षीच झाली महापौर
राजकारण

फडणवीसांचा विक्रम मोडीत; ही तरुणी 21व्या वर्षीच झाली महापौर

थिरुवनंतपुरम : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. परंतु त्यांचा हा विक्रम मोडीत निघाला आहे. नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर म्हणून त्यांची निवड झाली होती. त्या वेळी फडणवीस यांचं वय 27 वर्षं होतं. फडणवीस नागपूर महापालिकेचे नगरसेवक 21व्या वर्षीच झाले होते आणि तेही एक रेकॉर्डच होतं. आता मात्र केरळच्या एका तरुणीने फडणवीस आणि त्यानंतरच्या इतर तरुण महापौरांवर मात करत 21व्या वर्षीच महापौरपद मिळवण्याचा विक्रम केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिरुवनंतपुरम शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांची निवड झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सीपीआय(एम) सदस्य असलेल्या आर्या राजेंद्रन देशातल्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत. आर्या राजेंद्रन यांचं तिरुवनंतपुरमच्या एलबीएस कॉलेजमध्ये शिक्षण सुरू आहे. त्या तिथून इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी अभ्यास करत आहेत. पण इंजिनीअर व्हायच्या आधीच त्या शहराच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत आर्या कार्यरत होत्या. एसएफआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. आर्या यांनी महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली. सीपीआयएमच्या जिल्हा सचिवालयानेच त्यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. थिरुवनंतपुरमच्या मुदवनमुगल वॉर्डातून त्या निवडून आल्या. एवढ्या लहान वयात नगरसेवक होण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्याहून मोठा मान त्यांना शुक्रवारी मिळाला, जेव्हा त्यांची महापौरपदासाठी निवड झाली.