रजनीकांतच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा
राजकारण

रजनीकांतच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत होतं. त्यावरून सुपरस्टार रजनीकांत आज काहीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांनी आजही त्यांच्या राजकीय निर्णयाला वेगळी दिशा देत हा निर्णय जानेवारीपर्यंत पुढे ढकलला असल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का? अशी चर्चा रंगली असताना याबाबतीतील औत्सुक्य आणखी वाढलं आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी चेन्नई येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावरून रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय पक्षाची भूमिका ठरवत २०२१ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करु शकतात असं बोललं जात होतं.

दरम्यान, रजनीकांत काय निर्णय घेतात याकडे कित्येक दिवसांपासून तामिळनाडूमधील सर्व राजकीय पक्षांसह तेथिल जनतेचीही नजर लागली आहे. आजच्या बैठकीनंतर रजनीकांत निवडणूक लढणार की नाही यासंबंधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु रजनीकांत यांच्याकडून कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही.

दरम्यान, रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.