आयुष्मान भारत योजना फेल; युपीमध्ये ८७५ तर बिहारमध्ये केवळ १९रुग्णांवर उपचार
देश बातमी

आयुष्मान भारत योजना फेल; युपीमध्ये ८७५ तर बिहारमध्ये केवळ १९रुग्णांवर उपचार

नवी दिल्ली : केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना ही कोरोना काळात सपशेल अपयशी ठरली असल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात देशातल्या आरोग्य यंत्रणांबद्दलची सत्य परिस्थिती समोर आली. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, औषधं यांच्या अभावाने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. आजतक, इंडिया टुडे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत केवळ १९ करोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बिहारव्यतिरिक्त उत्तरप्रदेशात या योजनेंतर्गत ८७५ कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले तर झारखंडमध्ये १,४१९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. आयुष्मान भारत या योजनेची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. या अंतर्गत ५० कोटी भारतीयांना गुणवत्तापूर्ण आणि पण स्वस्तात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. या योजनेंतर्गत एक लाभार्थी परिवार दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करुन घेऊ शकतो.

आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये परिस्थिती तुलनेने चांगली असल्याची माहिती मिळत आहे. या राज्यांमध्ये साधारण दीड लाखांहूनही अधिक रुग्णांचा इलाज या योजनेंतर्गत करण्यात आला आहे. मात्र, पंजाब, गुजरात आणि दमणमध्ये एकाही कोरोनाबाधिताला या योजनेचा लाभ घेता आलेला नाही.